सांगली- कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सांगली, मिरज, कुपवाड तिन्ही शहरे निर्जंतुक कारण्याबाबरोबर आता सांगली महापालिका मुख्यालयात विषाणूचा प्रदुभाव होऊ नये, यासाठी सांगली महापालिका कार्यालयात आता स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेट सुरू करण्यात आले आहे. मंगळवार (दि. 7 एप्रिल) पासून सांगली महापालिकेत येणाऱ्यांना पालिका कार्यालयातील स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेटमधून निर्जंतुक होऊनच प्रवेश दिला जाणार आहे.
सांगली महापालिका मुख्यालय आवारातील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच हे स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेट सुरू करण्यात आले आहे. यामध्ये व्यक्ती प्रवेश करताच स्वयंचलीत सॅनिटायझिंग स्प्रे आपोआप सुरू होतो. या स्वयंचलीत सॅनिटायझिंग टनेलमध्ये प्रवेश केल्यावर 12 सेकंद निर्जंतुक औषधांचा फवारा केला जातो आणि त्यानंतर हे स्प्रे आपोआप बंद होतो. मंगळवारपासून हे स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेट सुरू झाले असून आता सांगली महापालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्यांना पहिल्यांदा या स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेटमध्ये 12 सेकंद थांबावे लागणार आहे. या ठिकाणी निर्जंतुक फवारा झाल्यानंतरच त्याला महापालिका कार्यालयात प्रवेश मिळणार आहे.