सांगली- शहरात नववर्षाच्या पहाटेच चारचाकी वाहनांची तोडफोड करत ती जाळून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात दोन चारचाकी वाहने पेटवून देत सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शहरातील 100 फुटी रोडवर ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -चर्चमध्ये नववर्षाचे स्वागत, ख्रिस्ती बांधवांनी केली येशूची प्रार्थना
सांगली शहरातील 100 फुटी रोडवर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी वाहनांची जाळपोळ करत तोडफोड केली. चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी या रोडवर असणाऱ्या गाड्यांवर अचानक हल्ला केला. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहन दुरुस्तीची गॅरेज आहेत. एक स्कॉर्पिओ व एक मारुती कार अशी दोन चारचाकी वाहने पेटवून देण्यात आली असून यात ही दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. तर, इतर चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. गाड्यांच्या काचांवर दगड मारून ही तोडफोड करण्यात आली आहे.