सांगली- आंध्र प्रदेश सरकारने आशा व गट प्रवर्तक महिलांसाठी चौपट वेतन वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही असाच निर्णय घेऊन राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रामध्ये 73 हजार आशा व गटप्रवर्तक महिला 'आरोग्य स्वयंसेवक' या गोंडस नावाखाली काम करत आहेत. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी या महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र, या महिलांना राज्य सरकारकडून अत्यल्प वेतन देण्यात येते. त्यामुळे राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान अठरा हजार रुपये वेतनासह विविध मागण्यांसाठी संघटना अनेक वर्षांपासून वेळोवेळी आंदोलन करत आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही.