सांगली- जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या उद्भवली आहे. जनावरांच्या चाऱ्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे चाऱ्याचे दर ३ हजार रुपये शेकडा पासून ४ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱयांचे कंबरडे मोडले असून तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांसह इतर गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. अशा परिस्थित जनावरांना जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील महिन्यात ज्वारीचा कडबा ३ हजार रुपये शेकडा दराने मिळत होता, आता त्याचे दर आता ४ हजारांवर गेले आहे.
दुष्काळी पट्ट्यात उसाचे वाढे हाच आता जनावरांचा चारा झाला आहे. परंतु, जिल्ह्यातील ३ साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. त्यामुळे शेजारील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरातून दिवसाला ५ ते ६ गाड्या वाढे जिल्ह्यात विक्रीसाठी येते. हा चारा खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते. परंतु, या चाऱ्यासाठी जादा किंमत मोजावी लागत आहे. शासनाकडून तत्काळ उपाययोजना अपेक्षित होत्या. मात्र, अद्यापही शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
जत तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही. आता प्रशासन निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहे. त्यामुळे चारा छावण्या कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. एकीकडे दुष्काळामुळे शेतमजुराच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांना उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही. आता मार्च महिना सुरू असून कडक उन्हाळ्याचे पुढील ३ महिने कसे काढायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.