सांगली - मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या विरहात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या रक्षा विसर्जनानंतर दुःख अनावरण न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत मुलीच्या वडिलांचे निधन झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सांगली शहरातल्या टिंबर एरियामधील भीमनगरमध्ये राहणाऱ्या 11 अकरा वर्षीय श्रद्धा सचिन भोसले या चिमुरडीचा दीर्घ आजाराने निधन झाले होते. 23 जूनला उपचार सुरू असताना श्रद्धाचा मृत्यू झाला होता. श्रद्धा ही सचिन भोसले यांची मुलगी होती. संपूर्ण भोसले कुटुंबावर श्रद्धाच्या मृत्यूमुळे डोंगर कोसळला होता. आज (गुरुवार) तिचा रक्षा विसर्जन होता. त्यासाठी वडील सचिन भोसले यांच्यासह कुटुंबातील नातेवाईकही गेले होते. रक्षा विसर्जनाचा विधी पार पडला, त्यानंतर परतत असताना सचिन भोसले यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे भोसलेंचा मृत्यू झाला.
मुलीच्या विरहात तिच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच बापाने सोडले प्राण... सचिन भोसले हा मिस्त्री काम करून आपलं कुटुंब चालवत होता. त्यांना श्रद्धा आणि एक मुलगा असे दोन मुले होते. त्यापैकी श्रध्दाला ब्लड कॅन्सर झाला होता. सहा वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. तर त्यांच्या भावाचे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते. भावाची पत्नी, मुले यांचीही जबाबदारी सचिन यांच्यावर होती. असे असताना श्रद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे भोसले कुटुंब दुःखात होते.श्रद्धाच्या मृत्यूमुळे भोसले कुटुंब अजून सावरले नव्हतं आणि त्यातच या कुटुंबाचा कर्ता-धरता असणारा सचिन भोसले यांचा मृत्यू झाला. मुलीच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने भोसले कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.