सांगली- विटा शहरामध्ये एका दवाखान्याचे छत कोसळून एक महिला ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. दोघी बहिणी औषधोपचारासाठी आल्या असता ही घटना घडली आहे. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली असून जखमी महिलेवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
औषधोपचारांसाठी गेलेल्या सख्ख्या बहिणींवर दवाखान्याचे छत कोसळले; एक जागेवर ठार, एक गंभीर जखमी - Vita Ashirwad Hospital
विटा शहरामध्ये एका दवाखान्याचे छत कोसळून एक महिला ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघी सख्ख्या बहिणी औषध-उपचारासाठी आल्या असता ही घटना घडली आहे. या घटनेची विटा पोलिसात नोंद झाली असून जखमी महिलेवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छत कोसळून महिला रुग्ण ठार
या घटनेबाबत विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा शहरातील लेंगरे रोडवर डॉक्टर दीपक कुलकर्णी यांचे आशीर्वाद क्लिनिक आहे. शहरातील आयटीआय कॉलेज समोर राहणाऱ्या अनिता सुरेश माळी व अलका बबन शिंदे या दोघी बहिणी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास औषधोपचारासाठी डॉ. कुलकर्णी यांच्या दवाखान्यात आल्या होत्या. यावेळी दवाखान्यात रुग्ण तपासणी सुरू असल्याने दोघी बहिणी दवाखान्याच्या बाहेरील भागात प्रतीक्षेत बसल्या असताना अचानक दवाखान्याच्या पुढच्या छताचा भाग कोसळला. तिथे बसलेल्या अनिता माळी यांच्या डोक्याला आणि मेंदूला जबर मार लागल्याने या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. तर अनिता यांची बहीण अलका शिंदे यांच्या डोके, कंबर आणि खालच्या बाजूला जबर मार लागल्याने त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेची नोंद विटा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरु आहे.