महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे': सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बनवले रेल्वेचे घर - रेल्वेचे घर

मिरजेच्या रोहिदास शिंदे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने नोकरीवरील प्रेमापोटी घराला चक्क रेल्वेच्या डब्ब्यात रूपांतर केले आहे. शिंदे यांच्या घराकडे पहिल्यावर जणू रेल्वेचं थांबली आहे, असा भास निर्माण होतो.

रेल्वेचे घर
रेल्वेचे घर

By

Published : Nov 6, 2020, 8:01 AM IST

Updated : Nov 6, 2020, 2:33 PM IST

सांगली- एखाद्या व्यक्तीचे कशावर आणि किती प्रेम असू शकते, हे सांगणे अवघड आहे. कारण सांगलीतील एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या घराकडे पाहिल्यावर याचा प्रत्यय येतो. मिरजेच्या रोहिदास शिंदे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने नोकरीवरील प्रेमापोटी घराला चक्क रेल्वेच्या डब्ब्यात रूपांतर केले आहे. शिंदे यांच्या घराकडे पहिल्यावर जणू रेल्वेचं थांबली आहे, असा भास निर्माण होतो.
तर चला पाहूया रेल्वेचं घर...

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बनवले रेल्वेचे घर

नोकरी बद्दल अशीही कृतज्ञता...

"या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे" प्रसिद्ध गीतकार अरुण दाते यांच्या गीतांचे हे शब्द... पण याही पलीकडे जाऊन काही व्यक्ती इतर अनेक गोष्टींवर प्रेम करतात.असचं एक प्रेम सांगलीच्या मिरज मधल्या सुभाषनगर मध्ये राहणाऱ्या रोहिदास शिंदे यांच आपल्या नोकरीवर असल्याचे पाहायला मिळतेय. रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर रेल्वेच्या प्रति असणाऱ्या प्रेमापोटी रोहिदास शिंदे यांनी आपल्या घराचे चक्क रेल्वेच्या डब्यात रूपांतर केले आहे. घराचा दर्शनी भाग हुबेहूब रेल्वेच्या प्रतिकृतीमध्ये साकारण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या घराकडे पाहिले तर जणू रेल्वेचा डब्बा असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

रेल्वेला मानले देवता !...

ज्या नोकरीमुळे आयुष्य सुखकर बनले, कुटुंब समृद्ध झाले, इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलांना त्यांना यशस्वीरित्या घडवता आले. त्या रेल्वेच्या ऋणापोटी रोहिदास शिंदे आणि त्यांच्या मुलांनी घराचे रेल्वेत रूपांतर केले आहे. आणि घराला "रत्न रोही" एक्सप्रेस,असे नाव दिले आहे.

रेल्वेच्या नोकरीमुळे कुटुंब स्थिर-स्थावर...

वयाची नव्वदी पार केलेले रोहिदास शिंदे आपल्या पत्नीसोबत या रेल्वेच्या घरामध्ये राहतात. 1950 मध्ये रोहिदास शिंदे रेल्वेत रुजू झाले आणि 1988 मध्ये रेल्वे सेवेतून निवृत्त झाले. पुणे आणि हुबळी या दोन डिव्हिजनमध्ये अखंडपणे शिंदे यांनी रेल्वे सेवा केली. शिंदे यांचे संपूर्ण आयुष्य हे जवळपास रेल्वेमध्ये गेले आहे. सहा मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये शिंदे हे आपल्या परिवारासह राहायचे. पण दहा बाय दहाच्या खोलीमध्ये संपूर्ण कुटुंब राहणे अशक्‍य होते. त्यामुळे मुले रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या रेल्वेच्या डब्ब्यात रात्रभर झोपायचे. अशा परिस्थितीमध्ये रेल्वेने त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार दिला. अशा परिस्थितीतून त्यांनी आपल्या कुटुंबाचे संगोपन केले. मुलांना रेल्वेच्या नोकरीच्या माध्यमातून उच्च शिक्षण दिले. त्यामुळे आज त्यांची सहाही मुले शासकीय व खाजगी क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.

नव्वदीतही रेल्वेच्या कार्यक्रमाला लावतात हजेरी...

रेल्वेमधील नोकरीमुळे आणि निवृत्तीनंतर आपलेही घर असावे, अशी इच्छा रोहिदास शिंदे यांची होती. सर्व मुले चांगल्या हुद्द्यावर आहेत. मात्र स्वतःचे घर असावे, त्यामुळे मुलांनी मिळून त्यांना सुभाषनगर या ठिकाणी घर बांधून दिले. पण रेल्वेवर असणारे त्यांचं प्रेम काही कमी झाले नव्हते. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही ते 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी मिरज रेल्वे स्टेशनवर जाऊन झेंडावंदनाच्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे रेल्वे प्रती असणारा ओढा त्यांच्या मुलांच्याही लक्षात आला होता.

वडिलांच्या रेल्वेच्या प्रेमापोटी बनवले रेल्वेचे घर...

मिरज पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सेवेत असणाऱ्या रोहिदास शिंदे यांचे सर्वात धाकटे मुलगे अनिल शिंदे सांगतात, आपल्या वडिलांचे रेल्वेवर पहिल्यापासून खूप प्रेम आहे. निवृत्तीनंतरही त्यांचे रेल्वेवर असलेले प्रेम कधीच कमी झाले नाही. रेल्वेच्या प्रेमापोटी प्रामाणिकपणे वडिलांनी रेल्वेची सेवा बजावली आणि त्याचे फळ आम्हा भावंडांना मिळाले. सगळे भाऊ आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर काम करत आहेत. कुणी प्राध्यापक, कुणी इंजिनियर, कुणी व्यवसायिक, एक भाऊ रेल्वे सेवेतून निवृत्त झाला आहे आणि मी स्वतः मिरज पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात कार्यरत आहे. आपल्या वडिलांनी रेल्वेची नोकरी केली आणि रेल्वेच्या नोकरीमुळे आम्हा भावंडांची प्रगती झाली. त्यामुळे आम्हालाही रेल्वेच्या बद्दल खूप अभिमान आहे. वडिलांनी तर अगदी दैवत मानून रेल्वे आपला दैवत म्हणून आजपर्यंत काम केला आहे. आपल्या वडिलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजेत, अशी नेहमी भावना मनात असायची आणि यादरम्यान

अशी सूचली कल्पना...

मिरज तालुक्यातील खटाव येथील वस्तीवरील एका शाळेला त्यांचा धाकटा मुलगा अनिल शिंदे यांनी भेट दिली. त्या शाळेला रेल्वेच्या प्रतिकृतीमध्ये रुपांतर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कल्पना आली की, आपण ही आपल्या वडिलांना अशा पद्धतीने एखाद्या रेल्वेच्या प्रतिकृतीचे घर बनवू शकतो. ही संकल्पना त्यांनी वडिलांच्या समोर मांडली. त्यानंतर वडिलांनी लगेच होकार दिला. मग भावंडांनाही याबाबतची कल्पना दिली आणि सर्वांनी एकमताने याला होकार दिला. खटावच्या कलाशिक्षक असणाऱ्या सुरेश लांडगे यांच्या माध्यमातून घराला रेल्वेचा रूप दिले आहे.

सरत्या शेवटीचा प्रवास रेल्वेतुन..!

38 वर्षे रोहिदास शिंदे यांनी रेल्वेची अखंडपणे सेवा केली आणि या सेवेचे फळ त्यांना चांगलेच मिळाले आहे. त्यामुळे आज ते आयुष्याच्या सरत्या शेवटीसुद्धा रेल्वेच्या घरात पत्नी सोबत आनंदाने राहत आहेत. आजही रेल्वेतून त्यांचा प्रवास सुरू आहे, असाच भास शिंदे यांच्या घराकडे पाहिल्यावर निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. आपल्या नोकरीवर आणि रेल्वेवर किती प्रेम आहे, हे सुद्धा यातू पाहायला मिळते.

Last Updated : Nov 6, 2020, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details