सांगलीत आणखी ४ जणांना कोरोना...तर ३ जण झाले कोरोनामुक्त - Covid 19 update
सांगली जिल्ह्यात आणखी ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सांगली - सांगली जिल्ह्यात आणखी ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या ही ८८ झाली आहे. तर आतापर्यंत २०६ रुग्णांची नोंद झाली असून यापैकी १११ कोरोना मुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी यामध्ये आणखी ४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये वाळवा आणि शिराळा तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. यात वाळवा तालुक्यातल्या येलूर येथील २६ वर्षीय महिला, इस्लामपूरमधील ४१ वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातल्या रिळे येथील १३ वर्षीय मुलगा आणि मणदूर येथील १६ वर्षीय मुलगी,अशा चौघांना कोरोना लागण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात तीन जण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातल्या खिरवडे येथील ५६ वर्षीय व्यक्ती आणि ८१ वर्षीय वृद्ध आणि सोलापूरच्या कडेबिसरी येथील ४८ वर्षीय कोरोन मुक्त झाले आहेत. मात्र, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्या ८८ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत २०६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आजपर्यंत १११ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत आणि ७ जणांचा मृत्यू झाला आहे.