सांगली -मुंबई आणि पुण्याहून आलेल्या सांगली जिल्ह्यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या धारावीमधून सांगलीत पोहोचलेली एक महिला आणि पुण्याहून वाळवा येथे आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ३०वर पोहोचला आहे. तर मिरजेत उपचार घेणाऱ्या ३ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज (शुक्रवार) यामध्ये आणखी २ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मुंबईच्या धारावी येथून गुरुवारी २० जण सांगलीच्या इस्लामपूर आणि सांगलीत पोहोचले होते. त्यांना तत्काळ प्रशासनाने ताब्यात घेऊन ॲडमिट केले होते. त्यापैकी १४ जणांचे स्वॅब अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यातील १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका ३७ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला सुट्टीसाठी सांगली शहरातील रेल्वे स्टेशन नजिकच्या उत्तर शिवाजीनगर येथे राहायला आली होती. तर वाळवा तालुक्यातील चांदोली वसाहतीतील एक २२ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. सदर तरुण हा पुण्याहून वाळव्याच्या चांदोली वसाहत येथे आला होता.
धारावी आणि पुण्यातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, तर तिघांची प्रकृती चिंताजनक
मुंबई आणि पुण्याहून आलेल्या सांगली जिल्ह्यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30वर पोहोचली आहे.
मिरजच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३ जणांची प्रकृती ही चिंताजनक बनली आहे. सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील 52 वर्षीय कोरोणाबाधित रुग्ण हा उपचाराखली असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, सदर व्यक्तीला फुफ्फुसाचा टीबी असून या व्यक्तीची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी आहे. त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून सदर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. तसेच खानापूर तालुक्यातील बलवडी येथील 55 वर्षीय कोरोणाबाधित व मोहरे येथील कोरोनाबाधित रुग्ण हे दोघे ऑक्सिजनवर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. या दोघांवरही डॉक्टरांचे लक्ष आहे.
सांगली येथील रेव्हेन्यू कॉलनीतील कोरोनाबाधित महिलेचा 14 दिवसानंतरचा कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून, ती कोरोनामुक्त झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही ३० झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.