रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील झोंबडी गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेले रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले, अशी माहिती गावच्या सरपंचांनी दिली आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप, ग्रामस्थांनी बंद पाडले काम - road construction
रत्नागिरीमधील गुहागर तालुक्यातील झोंबडी गावातील नागरिकांनी गावातील रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्यामुळे रस्त्याचे काम बंद पाडले.
नव्याने चालू असलेल्या या रस्त्याच्या कामात डांबर टाकले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ३ कोटींचे अंदाजपत्रक असणारे हे काम गेल्या ४ दिवसांपासून सुरू होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कामाच्या ठिकाणी येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
डांबर टाकून त्यावर खडी टाकून रस्त्याचे काम करण्याची तरतूद आहे, मात्र खाली डांबर न टाकताच काम केले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. खडी टाकून रोलिंग केलेल्या या रस्त्याचे दगड हाताने काढता येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी देऊनसुद्धा त्याची दखल घेत नसल्याने अखेर सरपंच आणि स्थानिक यांनी काम बंद पाडले.