रत्नागिरी - आम्ही तुमच्या सोबत आहोत. मात्र, स्वतःचे बरेवाईट करण्याचा विचार मनात आणू नका, असा धीर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथील ओल्या दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिला. आहे. आदित्य यांनी आज (रविवारी) लांजा तालुक्यातील कुवे आणि राजापूरमधील उपळे गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सकाळी त्यांचे विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते जिल्ह्यातील लांजाच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, राजन साळवी आदी उपस्थित होते.
माध्यमांसोबत बोलताना आदित्य म्हणाले, शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात सरळ पैसे कसे जातील यावर आमचा भर आहे. काही अटी शिथिल करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस झाला आहे. ओल्या दुष्काळग्रस्त भागात सर्वच राजकीय नेते फिरत आहेत. सोमवारी ते नाशिकच्या दौऱ्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. म्हणून स्वतःचे बरेवाईट करण्याचा विचार मनात आणू नका, असा धीर आम्हाला कोणालाही हाक मारली तरी आम्ही धावून येऊ आणि मदत करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.