महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात हेल्मेटची 'ढाल' करुन तरुणानं 'असा' वाचवला जीव

मित्राला सोडून घरी जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर तरुणाने हेल्मेटची ढाल करत तरुणाने जीव वाचवला.

विश्वनाथ लिंगायत

By

Published : Jun 3, 2019, 6:18 PM IST

रत्नागिरी- दुचाकीवरुन एकटं जाणाऱ्या तरुणावर बिबट्यानं हल्ला केला. . .त्यामुळं तो खाली पडला. . .पुढं आक्रमक बिबट्या चाल करुन आला. . . आजूबाजुला ना मानवी वस्ती. . .ना कशाचा आधार. . . . इतकंच काय. . . .जवळ ना काठी. . ना दगड-गोटे . . . अशावेळी करावं तरी काय. . . मात्र खंबीर तरुणानं डोक्यातलं हेल्मेट काढलं न त्याची ढाल केली. . . नरड्याचा घोट घ्यायला आलेल्या बिबट्यावर त्यानं हेल्मेटनं प्रहार केले. . . अन् बिबट्यानं पळ काढला. . .एखाद्या कथानकात घडावी, अशी ही घटना रत्नागिरीतील पावसजवळ घडली. विश्वनाथ लिंगायत असं त्या खंबीर अन् धाडसी तरुणाचं नाव.

माहिती देताना विश्वनाथ लिंगायत आणि उदय सामंत


विश्वनाथ शनिवारी संध्याकाळी रत्नागिरीहून दुचाकीने आपल्या मेर्वी गावी चालला होता. दरम्यान पावस जवळच्या बेहेरे स्टॉपजवळ विश्वनाथची दुचाकी आली आणि विश्वानाथचा काळ सुद्धा. पुलाचे काम चालू असल्यानं विश्वनाथनं दुचाकीचा वेग कमी केला. पण तेवढ्यातच एका बिबट्यानं चालत्या दुचाकीवर हल्ला केला. काही न कळलेला विश्वनाथ खाली कोसळला. बोबडी वळलेला विश्वनाथ त्यानंतर मात्र बिबट्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाला. डोक्यावरचं हॅल्मेट काढून त्यानं तेवढ्याच धिरानं हेल्मेटचा प्रहार बिबट्यावर केला. तब्बल दोन वेळा हॅल्मेटनं त्यानं बिबट्याचा प्रतिकार केला. दरम्यान, त्याला दुखापतही झाली. पण बिबट्याला त्यानं हेल्मेटनं हुसकावून लावलं. केवळ हेल्मेटमुळेच आपले प्राण वाचल्याचं विश्वनाथ सांगतो.


जखमी अवस्थेत पहाटे विश्वनाथनं कसबसं घर गाठलं. घरी झालेला प्रकार सांगितला. मग त्यानंतर घरच्यांनी जिल्हा रुग्णालय गाठलं. आपल्या मुलावर बिबट्याचा हल्ला झाला, अन् तो त्यातून केवळ हॅल्मेटमुळं वाचल्याची आठवण विश्वनाथच्या आईच्या डोळ्यात पाणी आणते.


सध्या गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विश्वनाथला प्रशासनाकडून मदत देण्यात आली आहे. तसा चेकही आमदार उदय सामंत यांच्या हस्ते विश्वनाथला देण्यात आला. मात्र सध्या चर्चा सुरू आहे, ती विश्वनाथच्या प्रतिकाराची.
दुचाकीस्वारांना हॅल्मेट घालण्याची सक्ती आहे. पण ही सक्ती धुडकावून अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. पण हेल्मेट अपघातातच नाही, तर अडचणीच्या काळात उपयोगी पडते, अनेक वेळा ते देवदूत म्हणूनही उपयोगात येते, याचा प्रत्यय विश्वनाथवर आलेल्या प्रसंगातून दिसून येतो. त्यामुळं हेल्मेटला विरोध करणाऱ्यांनो निदान आता तरी हेल्मेट वापरा...

ABOUT THE AUTHOR

...view details