महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; जवळून रेल्वे पाहण्याचा मोह बेतला जीवावर - stunt

सुनील याच्यासोबत असणाऱ्या 4 मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उंच पुलावरून चालत असताना १०.१५ च्या सुमारास मुंबईकडे जाणारी डबलडेकर रेल्वे आली. तेव्हा सर्व जणांनी पुलावर उभे राहण्यासाठी केलेल्या जागेचा आसरा घेतला. रेल्वे जवळ आली असता, अचानकपणे सुनील पवारने आम्हाला सोडून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

रल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

By

Published : Apr 15, 2019, 11:26 AM IST

रत्नागिरी- मित्रांसोबत रेल्वे पाहण्यासाठी रेल्वे पुलावर गेलेल्या एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुनील बुधाराम पवार, असे या तरुणाचे नाव असून रत्नागिरीतल्या कारवांचीवाडी येथील पारसनगर परिसरात तो राहत होता.

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी येथील नवनिर्माण महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या शुभम जाधव( रसाळवाडी), प्रथमेश यादव, (कारवांचीवाडी), अभिषेक खनगावकर( रसाळवाडी) आदित्य खापरे(साळवी स्टॉप), चिन्मय पांचाळ( आरोग्य मंदिर) आणि मृत सुनील पवार या मित्रांनी आज सकाळी फिरायला जाण्याचा बेत केला. हे सार्वजण थिबा प्यालेस येथे जाणार होते. मात्र, रेल्वे पूल बघायचा आहे, हा आग्रह धरत सुनील पवार या सगळ्यांना कुवारबाव आरटीओ ऑफिस जवळ असणाऱ्या रेल्वेच्या कुवारबाव सेतू या पुलावर घेऊन आला, असे इतर मित्राचे म्हणणे आहे.

दरम्यान, सुनील याच्यासोबत असणाऱ्या 4 मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार या उंच पुलावरून चालत असताना १०.१५ च्या सुमारास मुंबईकडे जाणारी डबलडेकर रेल्वे आली. तेव्हा सर्व जणांनी पुलावर उभे राहण्यासाठी केलेल्या जागेचा आसरा घेतला. रेल्वे जवळ आली असता, अचानकपणे सुनील पवारने आम्हाला सोडून रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला, असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच जय भैरी मंडळाचे कार्यकर्ते राजू तोडणकर, बाबू बामणे आणि अजित सावंत तत्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले. मात्र, सुनील पवार हा जागीच ठार झाला होता. रेल्वे पोलीस व शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून याबाबत पुढील तपास चालू आहे.

सुनील पवार हा तरुण रत्नागिरी पारस नगर येथील राहणारा असून त्याच्या वडिलांचा मार्बलचा व्यवसाय आहे. रेल्वे आलेली असतांना सर्वजण एका बाजूला उभे असताना हा एकच मुलगा दुसऱ्या बाजूला पळत का गेला? की स्टंट करण्याच्या नादात हा मृत्यू ओढवला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details