रत्नागिरी-जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथे माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दुसरीही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच आपली एक महिन्याची मुलगी शौर्याला बादलीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी आई शिल्पा प्रविण खापले हिला पोलिसांनी अटक केली असून, तिला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
उच्च शिक्षित असूनही केलं कृत्य
सावर्डेमधील वहाळ गावात महिन्याभरापूर्वी एका सैनिकाच्या घरी गोंडस मुलीच्या जन्माने घरात आनंदी वातावरण निर्माण झाले होते. सीमेवर रक्षण करणाऱ्या प्रविण खापले यांना आपल्याला पुन्हा एकदा मुलगी झाली आहे, ही गोड बातमी कळली आणि तिचा चेहरा पाहण्यासाठी महिनाभराची रजा घेऊन ते गावी आले. घरात आनंदी वातावरण होते. मात्र, प्रविण यांची पत्नी शिल्पा हिच्या मनात काहीतरी वेगळंच होते. शिल्पा ही उच्च शिक्षित असून काही महिन्यांपासून गावातील ग्रामपंचायतीमध्ये डाटा ऑप्रेटर म्हणून काम करत होती. या दोघांनाही एक चार वर्षांची पहिली मुलगी आहे. त्यानंतर पुन्हा शिल्पा खापले गरोदर राहिल्या आणि दुसरीही मुलगी झाली.
घरात कुणी नसल्याचा घेतला फायदा
घरात सासू, सून, आणि नवरा, चार वर्षांची मुलगी असा हा परिवार आहे . आपल्याला पुन्हा मुलगी झाली, यामुळे शिल्पा गेले काही दिवस तणावात होत्या. शुक्रवारी दुपारी शिल्पा खापले यांचे पती सासूला घेऊन बाहेर गेले असतांना शिल्पा यांनी घरात कुणी नाही बघून लहान मुलीला बाथरुम जवळील पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवून मारले. ही घटना पुन्हा कोणालाही कळू नये म्हणून आपल्या लॅपटॉपवर काम करत बसले. काही वेळ निघून गेल्यावर बाळाची शोधाशोध सुरु झाली. शेवटी एका मुलीने बाथरुममधील पाण्याने भरलेल्या टबमध्ये मुलीला पाहिले. थोडावेळ मुलगी घाबरली. त्यानंतर बाळाला टबमधूनन बाहेर काढण्यात आले. बाळ काहीच हालचाल करत नसल्यामुळे गावातील वालावलकर दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
काही तासातच पोलिसांनी लावला छडा
सावर्डे व चिपळूण पोलिसांनी या घडल्या प्रकारचा काही तासातच छडा लावला. चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाळाच्या आई आणि घरातील मंडळींची कसून चौकशी करण्यात आली . पोलिसांचा धाक दाखवल्यावर आरोपी शिल्पा खापले यांनी बाळाच्या मृत्यूचा खुलासा केला. आपल्याला दुसरी मुलगी झाली म्हणून आपणच हिला पाण्यात बुडवून मारले याची पोलिसांना कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला तिला ताब्यात घेतले असून चिपळूण न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.