रत्नागिरी -रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात शेट्येवाडीत पांढरा कावळा आढळला आहे. शेखर शेट्ये यांनी निरीक्षण करुन ही बाब व्हिडिओद्वारे सगळीकडे सांगितली आहे. गेल्या चार दिवसापासून शेट्ये यांच्या घराजवळ पांढर्या कावळ्याची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे.
पांढरा कावळा हा दुर्मीळ
चार दिवसांपूर्वी शेट्ये घराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांना खाणे घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे त्यांना वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच असल्याचे निष्पन्न झाले. काहींनी छायाचित्रे काढून सोशल मीडियावरही शेअर केली. पांढरा कावळा हा दुर्मीळ आहे. त्यामुळे हा कावळा काळबादेवीकरांसाठीच नव्हे तर रत्नागिरीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
'तो कावळा ल्युकेस्टिक'
कावळ्याचा पांढरा रंग हा नैसर्गिक आहे. काळबादेवी येथील तो कावळा ल्युकेस्टिक असल्याचे पक्षी तज्ज्ञ प्रतिक मोरे यांनी सांगितले आहे. काळा रंग येण्यासाठी शरीरात मेलॅनीनचे द्रव्य आवश्यक असते. ते कमी असल्यामुळे कावळ्याला पांढरा रंग येतो. एका अर्थाने हा पांढरा कावळा नाही तर त्याच्यातील अनुवंशिकतेमुळे तो पांढरा राहिला असावा, असे मोरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रसह, घाट भागात पावसाची शक्यता