रत्नागिरी -अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे. गेले 2 दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलाचे परिणाम सातत्याने दिसून येत आहेत. त्यामुळे पावसाचा हंगाम संपला तरीही अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने जोवाड चक्रीवादळा बाबत अलर्ट जारी ( Jawad Cyclone Alert Issued Maharashtra ) केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ -
दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून पूर्व मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं. सायंकाळीही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम फळबागांवर होणार असल्याने बागायतदार चिंतेत आहेत
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग्नेय अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांशी संवाद साधत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आता वादळी 'जोवाड' चक्रीवादळ येणार!
राज्यात हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे 2 डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल.