रत्नागिरी -कोरोनाने देशात थैमान घातले आहे. तसेच राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षा होणारचं असल्याचे सांगितले.
यूजीसीकडून राज्यसरकारला परीक्षांबाबत पत्र, विद्यापीठांच्या परीक्षा होणारचं - उदय सामंत युजीसीकडून रविवारी राज्य सरकारला विद्यापीठांच्या परीक्षांबाबत एक पत्र आले. येत्या ८ दिवसांमध्ये परीक्षांबाबतच्या गाईडलाईन्स देखील आम्हाला प्राप्त होतील. त्यानंतर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायला पाहिजे, असे युजीसीचे मत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभाग परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच होणार जारी -
विद्यापीठांच्या परीक्षांबाबत आज विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यामध्ये तज्ज्ञ समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. तसेच सदस्यांनी काही सूचना देखील केल्या. त्यावर सविस्तर चर्चा करून आयोगाद्वारे विद्यापीठांच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सांगण्यात आले.
युजीसीच्या मार्गदर्शक सूचनानंतरच विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन हे ठरणार -
युजीसीच्या मार्गदर्शन सुचनांनंतर परीक्षांचे वेळापत्रक तयार करावे. ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. तसेच सध्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षांविषयी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याच्या दृष्टीने सर्व कुलगुरूंनी आपल्या स्तरावर युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांनंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या, याविषयी प्रसिद्दी करावी. या मार्गदर्शक सुचनांसोबतच सध्या राज्यस्तरीय समितीने तयार केलेला आराखडा यांची योग्य ती सांगड घालून परीक्षांचे वेळापत्रक व पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. ऑनलाईन परीक्षा घेण्याविषयी काही अडचणी असल्यामुळे शक्यतो ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी करावी. परीक्षा जरी ऑनलाईन होणार नसल्या तरी ऑनलाईन टिचिंगची सर्व तयारी विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर करावी. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवता येतील, असेही सामंत यांनी सांगितले.