रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे 19 ऑगस्टपासून मुंबई येथून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. 19 व 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे, तर 21 ऑगस्ट रोजी वसई-विरार, 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड, 24 ऑगस्ट रोजी चिपळूण, 25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग या ठिकाणी नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा करणार आहेत. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा जनआशीर्वाद यात्रेचे कोकण प्रमुख प्रमोद जठार यांनी याबाबत माहिती दिली.
'कोकणासाठी जनआशीर्वाद यात्रा महत्त्वाची' -
मोदी सरकाराने गेल्या 7 वर्षांत केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवून आशीर्वाद घेणे आणि कोकणचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा महत्त्वाची आहे. चिपळूण, रत्नागिरीमध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून केंद्रीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांची भेट, पर्यटन विकासासाठी व्यावसायिकांची भेट नारायण राणे घेणार आहेत, अशी माहिती जनआशीर्वाद यात्रेचे कोकण प्रमुख प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकणात रिफायनरी होणे आवश्यक आहे. कोयनेचे पाणी कोकणात फिरवून त्याचा उपयोग होणार आहे. कोकणचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्याकरिता ही यात्रा परिवर्तनाची नांदी ठरेल, असे जठार यांनी स्पष्ट केले. पाण्याचा दुष्काळ दूर करणे, तरुणांना रोजगार, कोस्टल हायवे व विकास प्रकल्पांसाठी रिफायनरी होण्याकरिता आम्ही प्रयत्न करतो आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सर्व खासदार आपापल्या मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रा आयोजित करत आहेत.