रत्नागिरी-खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील बंगल्यातील नावाच्या पाटीला काळे फासणाऱ्यांचे तोंड लवकरच काळे होईल, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी दिला आहे. रत्नागिरी इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
सध्या एकीकडे कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. त्यातच आज खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील बंगल्यावरील नावाच्या पाटीला काळे फासले गेल्याची घटना समोर आली आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. राऊत यांच्या नावाच्या पाटीला काळे फासल्याचे प्रकरण शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा-'भाजपमध्ये गेलेल्या गँगने मराठा आरक्षणावर राजकारण करू नये'
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांना याबाबत रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत विचारले असता, ज्यांनी खासदार संजय राऊत यांच्या बंगल्याच्या पाटीला काळे फासले, त्या काळे फासणाऱ्याचे तोंड लवकरच काळे होईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.
दरम्यान, कंगना काय ट्विट करते ते आम्ही पाहत नाही, आम्ही झाले गेले विसरून गेलो आहोत, अशा शब्दात सामनाचे संपादक संजय राऊत यांनी कंगना वादावर आज प्रतिक्रिया दिली. कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत टीका केली होती. शिवसेनेच्या वतीने याविषयी कुठलेही आंदोलन केले जाणार नाही किंवा कोणताही प्रवक्ता बोलणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. आज संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.