रत्नागिरी - त्रिपुरा हिंसाचाराच्या (Tripura violence) पार्श्वभूमीवर उठणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. अफवा पसरवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. त्यामध्ये काही राजकीय मंडळी असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत (ShivSena MP Vinayak Raut) यांनी अमरावतीच्या घटनेबाबत (Amravati Violence) केला आहे. ते शनिवारी रत्नागिरीत (Ratnagiri) बोलत होते.
- नितेश राणेंच्या टीकेला खा. राऊत यांचे प्रत्युत्तर
दरम्यान सरकार मुस्लिम समाजाच्या मोर्चाच्या माध्यमातून हिंदूंना घाबरवण्याचे काम करत असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'अशा प्रकारचे दळभद्री विचार केवळ नितेश राणेंसारख्यांच्याच डोक्यात येऊ शकतात' अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
- राऊत यांचा भाजपावर हल्लाबोल -
या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांत ज्याप्रकारे शांतता, सुव्यवस्था आणि कुठेही जातीय दंगली न होता जे कामकाज चाललेले आहे, ते कदाचित सध्याच्या भाजपाच्या लोकांना पाहवत नसेल, त्यामुळे त्यांच्या माध्यमातूनच अशी चिथावणीखोर भाषा वापरली जातेय का? असा संशय बऱ्याच जणांना येत असल्याचे सांगत खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
- 'रझा अकादमीला सरकार कधीही पाठीशी घालणार नाही'
रझा अकादमी सारख्या देशद्रोही संघटनेला महाविकास आघाडी सरकार कधीही पाठींबा देऊ शकणार नाही, किंबहुना कधीही पाठीशी घालणार नाही असेही खा. राऊत यांनी म्हटले. 'रझा अकादमीला पाठीशी घालून आपले राजकारण करण्याचे असला दळभद्रीपणा महाविकास आघाडीच्या मनात कदापिही येऊ शकत नाही. हा विचार येऊ शकतो भाजपा आणि नितेश राणेंसारख्या दळभद्री विचारांच्याच नेत्यांमध्ये' अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी भाजपा आणि आमदार नितेश राणेंवर केली आहे.
हेही वाचा -Amravati Violence : विघ्नसंतोषी लोकांपासून तरुणांनी सावध रहा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन