रत्नागिरी - कोकणाला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभले आहे. कोकणातील अनेक गावे डोंगरदऱ्यांमध्ये वसलली आहेत. त्यातीलच चिपळूण तालुक्यातील तिवरे हे एक गाव आहे. याच गावात तिवरे धरण होते. या धरण परिसरात भेंदवाडी वसलेली होती. सर्व काही सुरळित सुरु होते. मात्र, 2 जुलै 2019 ची रात्र भेंदवाडीसाठी काळरात्र ठरली.
तिवरे धरणफुटीला एक वर्ष पूर्ण. काही जण जेवण्याच्या तर काही जण झोपण्याच्या तयारीत होते. मात्र, रात्रीच्यावेळी अचानक हे तिवरे धरण फुटले. यानंतर अवघ्या 15 मिनिटातच होत्याचे नव्हते झाले. या तिवरे धरण दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या दुर्घटनेच्या आठवणीने स्थानिकांच्या अंगावर आजही काटा येतो.
हेही वाचा -तिवरे धरण फुटी प्रकरण : धरणग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणार - प्रवीण दरेकर
या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी 21 जणांचे मृतदेह सापडले. मात्र, चिमुकली दुर्वा आजही बेपत्ताच आहे. तसेच 56 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. अनेक घरेही वाहून गेली. वाहून गेलेले साहित्य आजही नजरेस पडते. येथील उरल्या-सुरल्या शेतीने मोकळा श्वास घेतला. मात्र, तेव्हाची भेंदवाडी कुठेच दिसत नाही. याठिकाणी फक्त स्मशानशांतता दिसते. घटनेनंतर या दुर्घटनेच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली. मात्र, अद्यापही समितीचा अहवाल आलेला नाही.