रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामावरून पालकमंत्री अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार. असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर अनिल परब पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. चांगले काम करणाऱ्यांना काम दिले जावे ही आमची भूमिका असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५ वर्षापूर्वी शिवसेनेकडून महाआघाडीचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. या विधानानंतर शिवसेनेने या प्रकरणी सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे. या संदर्भातील प्रस्तावाची माहिती मला नाही, अशी चर्चा झाली याची माहिती आम्हाला नाही, असे सांगत परब यांनी चव्हाणांचा दावा अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला आहे.