रत्नागिरी - ठाकरे सरकारच्या महत्वकांक्षी असलेल्या शिवभोजन थाळीचं २६ जानेवारी रोजी उद्धघाटन झालं. उद्घाटन होऊन एकच दिवस उलटला नाही तोच या योजनेला बोगस लाभार्थ्यांचे ग्रहन लागले आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात चक्क ठेकेदाराचीच माणसं कुपन घेत असल्याचे पाहायला मिळाले. हीच माणसे योजनेच्या मेसमध्ये देखील काम करत होती.
गोरगरिबांसाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी अगदी थाटामाटात सुरू केली. मात्र, योजना सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लाभार्थ्यांमध्ये गोलमाल पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आला, त्याच ठेकेदाराची माणसं या शिवभोजन थाळीचे लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयाचा शिवभोजन थाळीचा ठेका डीएम एंटरप्रायजला देण्यात आला आहे. मात्र, याच डीएम एंटरप्रायजच्या २ महिला कर्मचारी चक्क लाईनमध्ये उभ्या राहून शिवभोजन थाळीचं कुपन घेत असल्याचे पाहायला मिळाले. माणसं कमी असल्याने सुपरवाईझरनेच आपल्याला कुपन घ्यायला सांगितल्याचं ही त्यांनी सांगितले.
शिवभोजन थाळीला बोगस लाभार्थ्यांचं ग्रहण निशा मांडवकर आणि शितल खेडेकर यांनी कुपन घेतल्यानंतर याच दोघी या ठिकाणी जेवण वाढण्याचे काम करताना पाहायला मिळाले. त्यानंतर याच दोन महिला कर्मचारी चक्क शिवभोजन थाळीच्या मेसमध्ये काम करताना पाहायला मिळाल्या. मात्र, ज्यावेळी आम्ही त्यांना बोलतं केलं त्यावेळी त्यांनी सुपरवायजर साहेबांनी सांगितले म्हणून आम्ही कुपन घेतल्याची कबुली दिली.
शिवभोजन थाळीचा एक ठेका जिल्हा शासकीय रुग्णालयातील डीएम एंटरप्रायजेसला देण्यात आला आहे. त्यामुळे योजनेच्या दुसऱ्याच दिवशी बोगस लाभार्थी दाखवण्याचा पराक्रम डीएम एंटरप्रायजने केला आहे. मात्र, इथले सुपरवायझर प्रवीण सावंत यांना या प्रकाराबाबत विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही त्या दोघींची एंट्री रद्द केली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचा उद्धेश चांगला आहे. मात्र, ठेकेदारच अशा पद्धतीने गोलमाल करणार असतील तर अशा ठेकेदारांवर वेळीच राज्य सरकारने कारवाई करणं आवश्यक आहे.