रत्नागिरी - जिल्ह्यात सोमवारपासून संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे, मात्र ती उद्योग, व्यावसायिकांसाठी मर्यादित स्वरुपात आहे. सर्वसामान्यांसाठी लॉकडाउनमध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा मुभा देण्यात आलेली नाही, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी बोलताना डॉ. मुंढे म्हणाले की, नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. सोमवारपासून (ता. 20) लॉकडाऊनमधून शिथिलता मिळणार, असा समज आहे. मात्र असे काही नाही. सर्वसामान्य नागरिकांना या नियमांमधून कोणतीही मुभा नाही. जो लॉकडाऊन 22 मार्चपासून सुरू होता, तोच आता 3 मेपर्यंत राहणार आहे. मात्र यातून काही उद्योग, व्यवसायांना परवानगी दिली आहे. ते ही ज्या ठिकाणी कामगारांची व्यवस्था होईल, असेच उद्योग, व्यवसाय आणि विकासकामे सुरू केली जाणार आहेत. दुसर्या गावातील कामगार असतील तर त्यांना एकदाच आणता किंवा सोडता येणार आहे. त्यानंतर संबंधित एजन्सी किंवा कंपनीने त्याची जबाबदारी घ्यायची आहे. रोज ये-जा करण्यास परवानगी नाही. मात्र काही अत्यावश्यक सेवा त्याला अपवाद आहेत.