रत्नागिरी -वनविभागाला वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मीळ असे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुख्य वनसंरक्षक (प्रा), डॉ. क्लेमेंट बेन यांचे मार्गदर्शनाखाली वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा मानद वन्यजीवरक्षक सातारा रोहन भाटे व विभागीय वनअधिकारी, दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख, वनक्षेत्रपाल आर. आर. पाटील यांनी खेड चिपळूण रा. महामार्ग. क्र. १७ रस्त्यावर खेड रेल्वे स्टेशनजवळील साईबाबा ढाबाजवळ सापळा रचण्यात आला होता.
दोन दुचाकी वाहनेही जप्त
संशयित खवले मांजर विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवले मांजर असल्याची खात्री झाल्यावर तत्काळ चार जणांना चारचाकी गाडीमध्येच ताब्यात घेण्यात आले. तर इतर दोन जणांना जवळपासच्या भागातून ताब्यात घेण्यात आले. या सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडून तस्करी करण्यासाठी आणलेले खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्हेकामी वापरलेल्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.