रत्नागिरी -सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी एक भाकीत केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार येणार नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल आणि त्यानंतर कदाचित गुजरातबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, हे माझे भाकीत आहे, असे अनंत गीते यांनी आज रत्नागिरीत म्हटले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपली आहे. एका ‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा आहे. असे सांगून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने हेच भविष्यातील विधानसभा उमेदवार असल्याचे शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जाहीर केले. ( Anant Geete criticized rebel MLA Uday Samant )
कृतज्ञता सोहळ्यात गरजले -माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गीते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, जि.प.चे माजी उपाध्यक्ष, कडवट शिवसैनिक यशवंत कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्याला 'आई'ला वाचवायचं - ‘मातोश्री' ही राजकारणातील प्रत्येक शिवसैनिकाची आई आहे. आज आपली आई अडचणीत असताना सर्व शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. जे कृतघ्न होते ते तोंड काळे करून निघून गेले. आता या गद्दारांना माफी नाही. शिवसैनिकच त्यांना टकमक टोक दाखविल्याशिवाय शांत बसणार नाहीत. गद्दारांमध्ये आपला पण एक गद्दार निघाला. कोकणातील पाचही गद्दारांना घरी बसविल्याशिवाय शिवसैनिकांनी शांत बसायचे नाही. आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपली आहे. एका ‘उदय'चा अस्त करून बनेंचा उदय करायचा आहे. असे सांगून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने हेच भविष्यातील उमेदवार असल्याचे शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जाहीर केले. त्यावेळी वि.दा.सावरकर नाट्यगृहात बने हितचिंतक, शिवसैनिकांनी टाळ्यांच्या गजरात गीते यांच्या घोषणेचे स्वागत केले.