रत्नागिरी- जिल्हा परिषदेतील शिक्षण सभापती शिवसेनेचे सहदेव बेटकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांची चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथे भेट घेतली. त्यामुळे बेटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. ते गुहागरमधून राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
सहदेव बेटकर हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला तयारीला लागण्यासही सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, भास्कर जाधव शिवसेनेत आल्यामुळे बेटकर यांचे नाव चर्चेतून मागे पडले. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर बेटकर यांची अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. मागील आठवड्यात बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी बेटकर यांनी मांडकी पालवण येथे खा. सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बेटकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून उमेदवारी देणार का? याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.