रत्नागिरी - गेली ५९ वर्षे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवळ धरण सध्या गाळात रुतले आहे. धरणाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवळ धरणात मोठ्या प्रमाणात गाळ
धरण उभारणी झाल्यापासून पानवळ धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षात प्रवाहाबरोबर येणारा गाळ धरणात येऊन साचला आहे.
धरण उभारणी झाल्यापासून पानवळ धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. गेल्या अनेक वर्षात प्रवाहाबरोबर येणारा गाळ धरणात येऊन साचला आहे. हजारो क्युबिक मीटर गाळ काढण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु, धरणातील गाळ काढून पाणी क्षमता वाढविण्यासाठी पालिकेने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. पानवळ धरणाचे नदीपात्र मोठे असल्याने त्यातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता दुप्पट होण्याची शक्यता आहे. सध्या पानवळ धरणात ५१८ दशलक्ष घनमीटर पाणी साठविले जाते. यामध्ये वाढ झाल्यास पंधरा जूनपर्यंत रत्नागिरी शहराला पानवल धरणातून पाणी पुरवठा करणे शक्य आहे.
धरणाच्या भिंतीचे मजबुतीकरण झाल्यानंतर गाळ काढल्यास १२ महिने रत्नागिरी शहराला पाणी मिळू शकते. यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सुमारे ५९ वर्षांपूर्वी असलेल्या शहराच्या लोकसंख्येचा आधार घेत पानवल येथे धरण उभारण्यात आले होते. ५ वर्षांत धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नैसर्गिक उताराच्या साहाय्याने पाणी नाचणे येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. नैसर्गिक उताराने ते शहरातील सर्व भागांना पुरविण्यात येते.