रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 71 वर पोहचली आहे.
जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढत आहे. आज जिल्हा रुग्णालयात आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला, राजापूर तालुक्यातील पाचल येथील एक महिला आणि रत्नागिरीतल्या राजीवडा परिसरातील एका 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूमृतांचा आकडा 71 वर पोहोचला आहे.
हेही वाचा- तरुणांनो सतर्क रहा! आता जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा
दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात आणखी 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 2064 वर पोहोचला आहे. यामध्ये रत्नागिरीतील 14, कामथे (चिपळूण) 10, कळंबणी (खेड) 19, दापोली 2, देवरुखमधील एकाचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले असून, तब्बल 19 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. तर, दापोली तालुक्यात 14 तर चिपळूण तालुक्यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. खेडमध्ये 6, लांजा आणि गुहागरमध्ये प्रत्येकी 2 , तर मंडणगडमध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.