रत्नागिरी - ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमधील हजारो शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या. या प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार कोकण आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 322 शिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशाला आयुक्तांनी स्थगिती दिली होती. परंतु, आदेश येण्यापूर्वी शिक्षक कार्यमुक्त झाल्याने त्यांना नवीन शाळेत रुजू होणे भाग पडले. त्या शिक्षकांच्या याचिकेवर 10 मे रोजी सुनावणी होणार असून आयुक्त काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची शहरी, निमशहरी दुर्गम, अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील शाळांच्या यादी तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. या यादीत शहरी आणि दुर्गम भागातील अनेक शाळांच्या अदलाबदली करण्यात आल्या होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. काही जिल्हा परिषदेच्या शिक्षण समित्यांनीही ठराव करून यादी बदलण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, त्यांना यश आले नाही. शासनाने या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करत बदल्या केल्या. त्याविरोधात काही शिक्षकांनी कोकण आयुक्तांकडे धाव घेतली तर काही शिक्षकांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.