रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या एका गावाला रत्नागिरी पोलिसांकडून 4 हजार फळझाडांचे वाटप करण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील वाघिवणे गावात वृक्ष दिंडी काढत या झाडांची लागवडही करण्यात आली. या वृक्षदिंडी पालखीचे भोई पोलीस अधिकारी झाले होते.
चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला खाकी वर्दी, रत्नागिरी पोलिसांकडून 4 हजार फळझाडांचे वाटप
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या एका गावाला रत्नागिरी पोलिसांकडून 4 हजार फळझाडांचे वाटप करण्यात आले आहे. दापोली तालुक्यातील वाघिवणे गावात वृक्ष दिंडी काढत या झाडांची लागवडही करण्यात आली.
निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना मोठा फटका बसला होता. या वादळामुळे फळबागा जमीनदोस्त झाल्या होत्या. या फळबाग शेतकऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी आधार दिला. दापोली तालुक्यातील वाघिवणे गावात सुमारे 4 हजार फळझाडे पोलिसांकडून वाटण्यात आली. पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर वाजत-गाजत दिंडी प्रत्यक्ष डोंगराळ भागात गेली. यावेळी गावातील प्रत्येकाच्या हातात एक रोप देण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कंबर कसून डोंगराळ भागात प्रत्यक्ष झाडांची लागवड केली. खाकी वर्दीचे हात फक्त कायदा राबवण्यासाठी नसतात, तर ते मनांना उभारी देण्यासाठी देखील असतात, हे पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. यावेळी उपस्थितांनी देशभक्तीपर गीते गाऊन, हम होंगे कामयाब व भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, गणेश इंगळे, दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी दीपक शिंदे, अशोक गायकवाड, उदय सागर यांच्यासह डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ अरुण माने, वैभव राजेमहाडिक, डॉ दीपक हर्डीकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.