रत्नागिरी- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
रत्नागिरीत मत मोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. तेथील आढावा देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाचही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबलावर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल आणि सर्व्हिस व्होटरच्या मत मोजणीचा एक राउंड होणार आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. तर गुहागर आणि दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. हे पाचही विद्यमान आमदार यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मात्र, गुहागर मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडून आलेले भास्कर जाधव यावेळी मात्र शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा शिवसेनेची ताकद वाढलेली दिसत आहे. परिणामी शिवसेनेच्या जागा वाढतात की, कमी होतात हे पाहाणे महत्त्वाचे असणार आहे.
यावेळी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघातून एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६०.९६ टक्के मतदान झाले आहे. यावेळी एकूण १० लाख १३ हजार ५५५ मतदार होते. त्यापैकी ७ लाख ९८ हजार ८७९ मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनी नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे गुरुवारी निकालानंतरच स्पष्ट होईल. पण, चिपळूण आणि दापोली विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रत्नागिरीत कोण मारणार बाजी?
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांचे आव्हान आहे. तर चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांची हॅटट्रिक राष्ट्रवादीचे शेखर निकम रोखणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी आणि प्रशासनाच्या मतमोजणी तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.
हेही वाचा-बँकांच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी एकवटले, रत्नागिरीत संप