रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विस्फोट झाला असून आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 522 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 522 पैकी 317 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 205 रुग्ण अँटिजेन चाचणी केलेले आहेत. 522 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 14 हजार 560 झाली आहे.
रोज रुग्णवाढ -
गेले काही दिवस जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. आज आलेल्या अहवालात 317 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 205 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे आजची एकूण 522 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. जिल्ह्यात आज सापडलेल्या 522 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 124, दापोली 55, खेड 36, गुहागर 63, चिपळूण 125, संगमेश्वर 99, मंडणगड 1, राजापूर आणि लांजा तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत. वाढत जाणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
8 जणांचा मृत्यू -
मागील 24 तासात उपचाराखाली असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीत सर्वाधिक 6 तर लांजा आणि गुहागर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.94 % आहे.