रत्नागिरी - कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ही ठासून भरली आहे. याचा अनेकवेळा प्रत्यय येतो. गुणवत्तेला योग्य दिशेची जोड मिळाली, तर काय होऊ शकते हे रत्नागिरी जवळच्या देवरूख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. गेली ४ वर्षे अपार मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांनी गरूड झेप घेतली आहे. आणि आता त्यांची ही मेहनत सातासमुद्रापार दिसणार आहे. कारण, या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार आता थेट लंडनच्या ट्रॅकवर धावणार आहे. या रेसिंग कार स्पर्धेत भारताकडून ही एकमेव रेसिंग कार असणार आहे.
लंडनच्या सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रॅकवर जुलै महिन्यात होणाऱ्या रेसिंग कार स्पर्धेत धावण्यासाठी कोकणची 'महालक्ष्मी-४' ही एक्सप्रेस सज्ज झाली आहे. लंडनमधल्या 'आय मेक फॉर्म्युला स्टुडंट' या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून या रेसिंग कार स्पर्धेचे १९९८ पासून आयोजन करण्यात येते. जगातील नावाजलेली ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारताकडून 'महालक्ष्मी-४' ही एकमेव रेसिंग कार असणार आहे. राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील ३० जणांच्या टीमने मागील ४ वर्षापासून ही कार तयार करण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे.
जगभरातील तब्बल १२० विद्यापीठांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी फक्त १०० वाक्यांत कारच्या तांत्रिक वैशिष्टय़ांची माहिती आणि व्यावसायिक गुणवत्ताही पटवून देण्याची अवघड परीक्षा द्यावी लागली. दरम्यान या कारची अनेकांना उत्सुकता असून, ही कार पाहण्यासाठी बाहेरून अनेक जण सध्या महाविद्यालयात येत आहेत.