रत्नागिरी -जिल्ह्यात आणखी 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 445 वर पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये सोमवारी रात्रीपासून आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 3 दापोली 3 आणि कामथे येथील 8 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 445 झाली आहे.
आतापर्यंत एकूण 17 जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आणखी 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 308 एवढी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता 120 पॉझिटिव्ह रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
कालचा दिवस राज्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक -
राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. काल राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४,२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याअगोदर २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते.