रत्नागिरी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील अनेक नेते, आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला आहे. विखे अनेक दिवस कुणाच्यातरी संपर्कात होते, त्यामुळे त्यांना अजूनही असा भास होत असावा, असा टोला तटकरे यांनी लगावला.
विखेंच्या वक्तव्याचा तटकरेंकडून समाचार; पाटलांना अजूनही भास होत असल्याचा टोला - NCP
कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील अनेक नेते, आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला आहे.
आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत सुनिल तटकरे बोलत होते. संभ्रम आणि संशय निर्माण करणारे राजकीय चित्र सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे विखे म्हणतात तसे काही असेल असे आपल्याला वाटत नाही, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जागा वाटपासंदर्भात पुढील आठवड्यात काँग्रेससोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल, असेही सुनिल तटकरे यांनी सष्ट केले. तसेच वंचित आघाडीने माहाआघाडीमध्ये यावे, असा प्रयत्न सुरू असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.