रत्नागिरी - कोरोनामुळे गेले 3 महिने लॉकडाऊन सुरू आहे. अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यात आणखी वाढीव वीज बिलांचा शॉक महावितरणने वीज ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. मात्र, बंद असलेल्या शाळांनाही भरमसाठ वीजबिलं आली आहेत. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी महावितरणला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली आहे. शाळांना ही वीजबिलं कोणत्या आधारावर आकारली गेली, याचा खुलासा तातडीने करावा असं पत्र खासदार राऊत यांनी महावितरणच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलं आहे.
बंद असलेल्या शाळांना भरमसाठ वीजबिलं, तातडीने खुलासा करण्याची खासदार राऊतांची मागणी - रत्नागिरी न्यूज
बंद असलेल्या शाळांनाही भरमसाठ वीजबिलं आली आहेत. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी महावितरणला पत्र लिहून खुलासा करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की, 'एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यात लाकडाऊनच्या कालावधीत सर्व नागरिक घरी असल्यामुळे पंखे, फ्रीज इत्यादी उपकरणांसाठी विजेचा वापर मोठया प्रमाणात झाला आहे. यामुळे याच कालावधीतील मागील वर्षाच्या विज वापराच्या तुलनेने या वर्षाच्या तीन महिन्यात लॉकडाऊनमुळे विजवापर जास्त झाल्याचे दिसून आले आहे, असे आपले म्हणणे आहे. मात्र, २३ मार्च २०२० रोजी लाकडाऊन कालावधी सुरू करण्यात आला. तेव्हापासून मागील ३ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. फारतर रात्रीच्या वेळी शाळेच्या पॅसेजमधील किंवा कंपाऊंडमधील दिवे सुरू होते. त्याचे युनिट जर आपण विचारात घेतले तर जास्तीत जास्त हे मासिक १० युनिटपर्यंत जाऊ शकते. तरीही आपल्या महावितरण विभागाकडून मागील ३ महिन्यांची दामदुप्पट वीज वीले शाळांना आकारली गेली. शालेय संस्थाना ही आकारलेली दामदुप्पट वीजबीले कोणत्या आधारावर आकारली गेली, याचा खुलासा तातडीने करावा' असं राऊत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.