रत्नागिरी -गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना कोकणात येता यावं यासाठी कोकण रेल्वेच्या अटी, शर्थींमध्ये शिथिलता मिळावी यासाठी कोकणातील आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. खेड- दापोलीचे आमदार योगेश कदम यासाठी पुढाकार घेत आहेत. लवकरात लवकर कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांतील सर्व आमदारांशी बोलून सर्व शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ व गणेशेत्सवासाठी चाकरमान्यांसाठी रेल्वेचे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी करणार असल्याचं आमदार योगेश कदम यांनी सांगितलं.
हेही वाचा -थेट मंत्रालयातच 'चिअर्स'! दारूच्या बाटल्या सापडल्या, विरोधक आक्रमक
वेध गणेशोत्सवाचे -
मुंबईतल्या चाकरमान्यांना आता वेध लागलेत ते गणेशोत्सवाचे. कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच नोकरीसाठी कुठेही असलेला कोकणी माणूस या सणाला आपल्या गावी हमखास येतोच. मात्र, गेल्या वर्षीपासून या सणावर कोरोनाचं सावट आहे. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव आहेच. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना कोकणात येता यावं यासाठी कोकण रेल्वेचे निर्बंध शिथिल करावेत यासाठी कोकणातले आमदार एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
कोकणातील आमदार गणेशोत्सवाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. गणेशेत्सवासाठी रेल्वेचे निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आरजव केली जाणार आहे. मुंबई लोकलप्रमाणे दोन डोस घेतलेल्या चाकरमान्यांना कोकणात प्रवासाची विनाअट मुभा द्यावी, अशी मागणी केली जाणार आहे. दोन डोस घेतलेल्यांना कोकण रेल्वेतूनसुद्धा प्रवासाची अट देण्यात यावी, अशी मागणी केली जाणार आहे. खेड दापोली मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांनी याची माहिती दिली आहे. नियमात शिथिलतेसाठी तिन्ही जिल्ह्यातील आमदारांशी बोलून आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे जाईल अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
हेही वाचा -पेगासस प्रकरणावर समांतर वादविवाद नको, सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त