रत्नागिरी - मिरजोळे पाडावेवाडी येथील 13 वर्षीय निखिल कांबळे या सातवीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. निखिलचा मृतदेह शनिवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत सापडला. निखिलची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली असून मृतदेह एका चरात दगड टाकून लपवला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अंगातील कपड्यांवरून निखिलची ओळख पटली.
11 फेब्रुवारीपासून निखिल बेपत्ता होता. त्यानंतर 12 फेब्रुवारीला शहर पोलीस ठाण्यात निखिल हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. निखिलचा शोध घेण्यासाठी रेल्वेस्टेशन परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. पण निखिलचा शोध लागत नव्हता. शनिवारी सकाळी मिरजोळे घवाळवाडी सडा येथे प्रभाकर करंदीकर यांच्या सामाईक जागेच्या शेजारी असलेल्या बागेत एक कामगार वानरांना हाकलण्यासाठी सड्यावर गेला होता. त्याला झुडपाजवळून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. वास तिव्र असल्याने त्याने जवळ जावून पाहिल्यानंतर मोठ्या दगडांखाली सडलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर या घटनेची माहिती त्याने मालकांना दिली.
हेही वाचा -रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर बेछूट गोळीबार; कारण अस्पष्ट