रत्नागिरी -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना भेटावे, असं आज राज्यपालांनी राज ठाकरे यांना सांगितल्यानंतर शिवसेनेने या प्रकरणात सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल महोदयांना नेमकं काय म्हणायचं आहे हे मला देखील सांगता येणार नाही, कारण त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत 'दोघांमध्ये झालेल्या चर्चेवर मी बोलणं योग्य नाही'
यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज राज्यपालांना भेटले, हे आम्ही देखील प्रसार माध्यमातून पाहिलं, ज्यावेळी राज्यपाल महोदयांनी त्यांना सांगितलं की आपण शरद पवार यांची भेट घ्या त्यावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, मी स्वतः शरद पवार यांना भेटणार आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी मनसे अध्यक्षांना कशासाठी पवार यांना भेटायला सांगितलं, कुठची भूमिका मांडायला सांगितली, ही त्या दोघांमध्ये झालेली चर्चा आहे. त्यामुळे त्या चर्चेवर मी बोलणं योग्य नाही, असं सामंत यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांची महाविकास आघाडी काम करते - सामंत
दरम्यान, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मला माहिती नाही, मात्र आपण जसे वेगवेगळे अर्थ लावू तसे अर्थ लागू शकतात. पण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, कदाचित ज्यांना माहिती नाही ते अज्ञानी आपण समजू, की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांची ही महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार चालवत असताना शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सर्वांशी चर्चा करून उद्धव ठाकरे सरकार चालवतात आणि हे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार आहे आणि ते सर्वांना मान्य आहे, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी दिली आहे.