रत्नागिरी -मान्सून येत्या काही दिवसात कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. मात्र, सध्या कोकण किनारपट्टीवर लगबग सुरू आहे ती मच्छिमारांची. कारण, आजपासून (1 जून) या हंगामातील कोकणातला मच्छिमारी हंगाम थंडावणार आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत यांत्रिक मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे आता कोकणातल्या किनाऱ्यावर बोटी विसावल्या आहेत.
बंदी का?
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार, 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंदी घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळतो. त्यामुळे मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येते.
या मासेमाऱ्यांना बंदी नाही
पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही. बिगर यांत्रिक बोटींना खाडीपात्र हवामान शांत असताना किनाऱ्यालगत मासेमारी करता येऊ शकते.