रत्नागिरी -म्हाडा प्राधिकरणाची राज्यस्तरीय बैठक रत्नागिरी येथे पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना म्हाडातर्फे घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरीत म्हाडाच्या राज्यस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी, बैठकीत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच 155 कोटींची तरतूद करून रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वसाहतीचा प्रश्न निकाली लागल्याचेही त्यांनी सांगितले.
आचारसंहितेपूर्वी गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात लॉटरी निघणार असल्याचा महत्त्वाचा खुलासा सामंत यांनी यावेळी केला आहे. हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीसमोर 28 ते 30 ऑगस्ट रोजी यासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यात म्हाडा आपली बाजू मांडणार असल्याचेही सामंत म्हणाले. लवकरच सोडती बाबत निर्णय होईल असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं व एक नाट्यगृह आणि रत्नागिरीत दोन नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू करणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 160 घरांची स्किम प्रस्तावित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.