रत्नागिरी- तालुक्यातील खेडशी येथील मैथिली गवाणकर या युवतीच्या खुनातील संशयिताला तब्बल एक वर्षानंतर पकडण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलं आहे. कोणताही भक्कम पुरावा नसताना देखील केवळ पोलिसांची तीक्ष्ण नजर, चतुराई आणि चौफेर तपासाच्या जोरावर रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे.
निलेश उर्फ उक्कू प्रभाकर नागवेकर (35,रा.भंडारवाडी खेडशी,रत्नागिरी) असे या संशयित आरोपीचं नाव आहे. 9 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळच्या सुमारास मैथिली प्रवीण गवाणकर (16,रा.चिंचवाडी खेडशी,रत्नागिरी ) ही बकऱ्या चारण्यासाठी खेडशी गावातील मोडा जंगलात गेली होती. तेव्हा अज्ञाताने तिच्या डोक्यात जड वस्तू मारून तिचा खून केला होता. त्यानंतर तब्बल एका वर्षानंतर या प्रकरणातील संशयिताला पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे.
मैथिली खेडशी येथील महाविद्यालयात अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. 9 ऑगस्ट 2019 रोजी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर मैथिली 4 वाजेचाच्या सुमारास शेळ्या घेऊन चिंचवाडी सडा येथील जंगलात गेली होती. मात्र सायंकाळी 6 वाजले तरी ती घरी परतली नाही. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास शेळ्या घरी आल्या. मात्र मैथिली काही आली नव्हती. त्यामुळे तिच्या शोध घेण्यात आला. त्यानंतर रात्री सडा येथील जंगलात एका झाडाखाली मैथीलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता.