रत्नागिरी - एलईडी मच्छिमारी पध्दत बंद व्हावी यासाठी माझा व खासदार विनायक राऊत यांचा मच्छिमारांना पाठिंबा आहे. पर्ससीनची २ महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी म्हाडाचे अध्यक्ष आणि आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
म्हाडा अध्यक्ष आणि आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया सर्व मच्छिमारांचे पूनर्वसन करावे या मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री राधामोहन यांची मच्छिमारांच्या शिष्टमंडळासह भेट घेण्यात आली. मात्र, त्या भेटीचा विपर्यास काही मंडळींकडून करण्यात आला. आम्ही फक्त पर्ससीनवाल्यांच्या मागणीसाठीच गेलो होतो, असाही प्रचार चालवला. पण जे-जे मच्छिमार आहेत, त्या सर्वांनाच न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी गेलो असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
पर्ससीन व पारंपरिक मच्छिमार यांच्यात वाद लावून दरी निर्माण करण्याचा प्रयास काहींनी चालवला आहे. आपल्याच एका मच्छिमार घटकाला खोटे सांगून नाहक झुंजवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे पारंपरिक व पर्ससीननेट मच्छिमार यांच्यात पारदर्शक समन्वय रहावा, अशी आमची भूमिका आहे. काहीजण बाहेरून येतील व वाद लावून निघून जातील. त्यासाठी याठिकाणी मच्छिमारांनीही सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांमत यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला पारंपरिकचे आप्पा वांदरकर व पर्ससीननेटचे विकास सावंत उपस्थित होते. वांदरकर यांनी सांगितले की, आमचा मच्छिमार उध्वस्त होत आहे. त्यामुळे पर्ससीनला विरोध नाही, तर एलईडीला विरोध होता. एलईडी लाईट वापरामुळे पारंपरिक मच्छिमारांनी पर्ससीननेटला विरोध दर्शवल्याचे सांगितले. आज मत्स्य व्यवसाय विभागाला मोठा हप्ताही दिला जात असल्याचा आक्षेप वांदरकर यांनी केला.
कोकण किनारपट्टीवर एलईडी मच्छिमारी बंदीचा नियम स्थानिक पर्ससीननेट मच्छिमारांना लागू केला जात आहे. पण परपांतीय मच्छिमार बोटींना तो नियम लागू केला जात नाही. या बोटी बिनधास्तपणे एलईडी मच्छिमारी करत आहेत. या बोटींवर कारवाईसाठी ती वस्तुस्थिती दाखवून देण्यासाठी आम्ही गस्ती नौका प्रशासनाला देऊ. एलईडी मच्छिमारीसाठी आमचाही विरोध आहे. पण ही बंदी केवळ स्थानिकांवर नको तर संपूर्ण किनारपट्टीवर करावी. नाहीतर आमच्याही एलईडी चालू राहतील, असे पर्ससीननेटचे विकास सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक किरण सांमत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर संघटक प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.