महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरी : मिरजोळेत पुन्हा एकदा भूस्खलन, शेतकरी चिंतेत - ratnagiri landslide news

मिरजोळे परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतजमीनीजवळ भूस्खलन होत असल्याने शेतीला धोका निर्माण झाला आहे.

land sliding in ratnagiri
मिरजोळेत पुन्हा एकदा भूस्खलन, शेतकरी चिंतेत

By

Published : Jul 21, 2020, 3:11 PM IST

रत्नागिरी - मिरजोळे परिसरातील खालचापाट येथे पुन्हा एकदा पावसामुळे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतजमीनीजवळ भूस्खलन होत असल्याने शेतीला धोका निर्माण झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी भूस्खलन होत असून संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, अद्याप त्याकडे स्थानिक राजकारणी किंवा प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करत आहेत.

भूस्खलनामुळे जमिनीला भेगा पडून मोठ्या प्रमाणात माती वाहत असल्याने शेतजमिनीचा ऱ्हास होत आहे. शेतातील मध्य भागाला तडे जात असल्याने जवळपास 15 एकरांहून जास्त शेती संकटात आली आहे.

यापूर्वी प्रशासकीय अधिकार्‍यांनी पाहणी करून येथील जमिनीला तडा जाण्याच्या या प्रकाराची भौगोलिक तज्ज्ञांकडून पाहणी केली होती. परिघाकृती भूस्खलनाचा हा प्रकार त्यावेळी नमूद करण्यात आला. तसेच नुकसानीचा अहवाल देखील तयार करण्यात आला होता. त्यावर उपाययोजना सुचवण्यात आली होती. यानंतरही सातत्याने पाठपुरावा करून यावर उपाय करताना काँक्रीटचा धूपप्रतिबंधक बंधारा आणि नदीवर छोटा बंधारा (धरण) बांधण्यात आले. त्यावर सुमारे 15 ते 20 लाख खर्च झाले. पण उपाययोजना करूनही मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जमीन सुमारे 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट उंच खचू लागली आहे.

जमीन खचण्याच्या प्रकारामुळे येथील लोकवस्तीलाही धोका असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी केलेली उपाययोजना अर्धवट असून आणखी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. या गावठाण परिसरात दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर, भाऊ भाटवडेकर यांची शेतजमीन आहे. बंधारा उभारल्यानंतर नदीच्या प्रवाहात बदल झाल्याने जमिनीखाली पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा खचण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फक्त आश्वासन न देता लोकप्रतिनिधीेनी प्रत्यक्ष कृतीतूनच हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details