रत्नागिरी- मुंबई मुसळधार पावसाने तुंबली आहे. मात्र, त्याचे पडसाद कोकणात पाहायला मिळाले. चाकरमान्यांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेला याचा फटका बसला आहे.
मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका; तीन गाड्या रद्द
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका कोकणालाही बसला आहे. रेल्वे रूळावर पाणी साचल्याने ३ गाड्या रद्द करण्यात आल्या असून रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले आहे.
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर सुटणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या पनवेलवरुन सोडण्यात आल्या. दादर-रत्नागिरी पँसेंजर, मुंबई सीएसटी-करमाळी तेजस एक्सप्रेस, आणि दादर -मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मांडवी एक्सप्रेस सकाळी पनवेल वरुन सोडण्यात आली आहे. तर मत्सगंधा एक्सप्रेस देखील पनवेल स्थानकातून सोडण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला. त्यामुळे कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर पावसाचा परिणाम दिसून येत आहे. कोकणात पाऊस नसल्याने कोकणातील रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या उशिराने धावत होत्या.