रत्नागिरी -जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव येथे रिफायनरी उभारण्यासंदर्भात हालचालींना आता वेग आला आहे. एमआयडीसीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बारसू, सोलगाव या भागाची पाहणी करण्यात आली आहे. जागेची पाहणी करताना पूर्णपणे गुप्तता पाळली गेली. अधिकाऱ्यांना फोटोही काढण्यास मनाई करण्यात आली होती. या पाहणीत प्रकल्पस्थळ, तेथील लोकवस्ती आणि पाण्याची उपलब्धता आदी माहिती जाणून घेण्यात आली.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून बारसू-सोलगावची पाहणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी
सुरुवातीला झालेल्या विरोधामुळे रद्द झालेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या नाणार आणि बारसू अशा दोन्ही ठिकाणी चढाओढ सुरू आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी विरोध आणि तितकेच समर्थन मिळत आहे. नाणार येथील प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोध असल्यामुळे जवळच्या बारसू-सोलगाव पंचक्रोशीचा प्रामुख्याने विचार सुरू झाला आहे. वाढत असलेले समर्थन, बदलत असलेले राजकीय मतपरिवर्तन यामुळे प्रकल्पाच्या आशा पल्लवित होत चालल्या आहेत, असे असतानाच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी एमआयडीसीसह रिफायनरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रस्तावित बारसू सोलगावचा दौरा केला. या गोपनीय दौऱ्यात या अधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेसह सर्वच गोष्टींची पाहणी केली. तेथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रिफायनरीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेसह पोषक गोष्टी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कुठलाही राजकीय रंग नको म्हणून या दौऱ्याची कुणा राजकीय नेत्यांनाही कल्पना दिली गेली नव्हती. या हालचालींमुळे प्रकल्प होण्याच्या आशा पल्लवित होत चालल्या आहेत.
हेही वाचा -कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असं गाऱ्हाणं घालत बाप्पाला निरोप...