रत्नागिरी - चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडत असून शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. ढगफुटी सारखा पाऊस चिपळूणमध्ये पडत असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पुरामुळे घरातील पाण्यामधून सामान काढताना तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
कुमार चव्हाण, असे मृत तरूणाचे नाव आहे. बहारदूरशेख नाका येथे घरातील सामान वाचवण्यासाठी तो गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने कुमारचा घरातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
पावसामुळे वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे चिपळूण शहरात सर्वत्र पुराचे पाणी शिरले. बाजारपेठ, पान गल्ली, मध्यवर्ती बसस्थानक, मरकंडी, बहादूरशेख नाका, खेर्डी, मार्कंडी परीसर हे सर्व भाग पाणीमय झाले आहेत. पावसाचा जोर थांबत नसल्याने पुराचे पाणी 2005 च्या पुराची पातळी गाठणार, अशी शक्यता आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर रामतीर्थ तलाव परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तर मुरादपूर आणि खेर्डी सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मार्कंडी परिसरातील विद्युत प्रवाह थांबविण्यात आला आहे. त्यामुळे येथील लोकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.
तसेच वाशिष्टी नदीची पातळी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खेर्डी येथे पाण्यामुळे चिपळूण-कराड मार्ग देखील काही काळ बंद होता.6 तासांनंतर हा मार्ग सुरू करण्यात आला आहे.