रत्नागिरी-चिपळूण पूरग्रस्तांना पुन्हा जिद्दीने उभे करण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे गेले दोन दिवस चिपळूण येथे आहेत. चिपळूणवासियाना आवश्यक वस्तू वाटप करतानाच त्यांच्याशी संवाद साधत निलेश राणे चिपळूणवासियांची दुःखे जाणून घेत आहेत.
माजी खासदार निलेश राणे हे नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसतानाही शुक्रवारी सकाळी मुंबईतून निघून चिपळूणला पोहोचले. सोबत मदतीचे आणलेले साहित्य तिथल्या नागरिकांना देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी संध्याकाळी तेथे दाखल झाल्यानंतर चिपळूण खेर्डी येथील सती समर्थनगर येथील सुमारे 80 ते 90 पूरग्रस्त कुटुंबांना निलेश राणे यांनी चटई, ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली.
तिथल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुरानी जाखड यांच्याकडून आपत्तीचा आढावा घेतला.
हेही वाचा-महापुरामुळे चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
मदत कार्य शनिवारीही सुरूच
निलेश राणे यांचे हे मदत कार्य शनिवारीही सुरूच होते. शनिवारी त्यांनी चिपळूण पेठमाप तांबट आळी येथील पूरग्रस्त कुटुंबांना, वडनाका पवार आळी येथील पूरग्रस्त कुटुंबांना चटई, ब्लॅंकेट व फरसाण, चिवडा, चकली, बिस्किटे, पाणी जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. चिपळूण बाजारपेठ मधील व्यापाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन पूरस्थितीत झालेल्या हानीची माहिती दिली.
हेही वाचा-पूर ओसरला... पण आता जगावं कसं हो सरकार? पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावर पूरग्रस्तांची मदार