रत्नागिरी- येत्या काही दिवसात मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. मात्र, सध्या कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. कारण १ जून ते ३१ जुलैपर्यंत यांत्रिक मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे आता कोकणातल्या किनाऱ्यावर बोटी विसावल्या आहेत.
कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या; उद्यापासून यांत्रिक मासेमारी २ महिने बंद - किनारपट्टी
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार १ जून ते ३१ जुलै २०१९ या ६१ दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार १ जून ते ३१ जुलै २०१९ या ६१ दिवसांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येते. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही. बिगर यांत्रिक बोट असणाऱ्या मच्छीमारांना किनाऱ्यालगत खाडीपात्रात हवामान शांत असताना मासेमारी करता येऊ शकते.
मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा असणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५८० यांत्रिक नौका आहेत. या सर्व नौकांना हा बंदी आदेश लागू असणार आहे. मात्र, बंदी आदेश मोडल्यास नौका, मासळी जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य खात्याने दिला आहे. तसेच अशा अवैध मासेमारी करणाऱ्या नौका ज्या संस्थेच्या सभासद असतील त्या संस्थांवरही कारवाई करण्यासाठी माननीय आयुक्तांकडे प्रस्तावित करण्यात येईल, असे रत्नागिरीतील साहाय्यक मत्स्य आयुक्त आंनद पालव यांनी सांगितले आहे..